जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसने आता पुण्यातही शिरकाव केला आहे. आजपर्यंत या विषाणूची लागण झालेले पाच रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः दिली आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. शिवाय, आरोग्य विभागामार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे. पुण्यात ज्या भागातील रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या भागातील शाळांना रविवारपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय स्थानिक शाळा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याबाबात पालकांना देखील कळवण्यात आले आहे.
दिवसभरात पुण्यात करोनाचे पाच रुग्ण आढळून आल्याने पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे करोनाची बाधा ज्या भागातील नागरिकांना झाली आहे, तेथील नागरिक अधिकच चिंतेत असल्याचेही दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व खबरदाऱ्या घेतल्या जात आहे. लहान मुलांचा या विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे.
आजपर्यंत एकूण ३०४ नमुने संकलित करण्यात आले आहेत, या पैकी २८९ नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ते निगेटिव्ह व पाच पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आणखी दहा नमुन्यांच्या तपासणीचा निकाल यायचा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेले आहे. तसंच कोणत्याही ठिकाणी वावरताना वैयक्तिक स्वच्छता पाळावी. तंसंच खोकताना, शिंकताना मास्क ऐवजी, रूमाल वापरावा असंही आरोग्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment