corono: 'ते' सहा प्रवासी कस्तुरबामध्ये दाखल |
पुण्यातील हे कुटुंब एका खासगी ट्रॅव्हल कंपनीसोबत दुबईला फिरायला गेले होते. परदेशातून प्रवास करून आल्यामुळे त्यांनी पुण्यातील रुग्णालयात आपली तपासणी करून घेतली. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोग्ययंत्रणेची चक्रे वेगात फिरली आणि या कुटुंबासोबत विमानातून प्रवास केलेल्या मुंबईतील सहा प्रवाशांचाही शोध घेण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पुण्यातील 'त्या' कुटुंबासोबत विमानातून प्रवास केलेल्या मुंबईतील सहा प्रवाशांचा शोध मंगळवारी मुंबई महापालिकेने घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल आज, बुधवारपर्यंत येतील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुरेश काकणी यांनी सांगितले.
दरम्यान, आतापर्यंत करोनासाठी जे देश घोषित केले होते, त्यामध्ये दुबईचा समावेश नव्हता. या संशयित रुग्णांनंतर मात्र या यादीत दुबईहून आलेल्या प्रवाशांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
पालिकेसोबत सार्वजनिक रुग्णालयांमध्येही सज्जता ठेवण्यात आली आहे. जेजे रुग्णालयामध्ये गरज पडल्यास टप्प्याटप्याने खाटा वाढवण्यात येणार आहेत. ही क्षमता नव्वद इतकी असेल.
- करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रणपूर्व तयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून, राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ खाटा उपलब्ध आहेत.
- केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशांतील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येणार आहे. त्यातील करोनासंसर्गाची लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येणार आहे.
- मोठ्या प्रमाणावर करोनाबाधित असणाऱ्या १२ देशांमधून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास रोज देण्यात येते. बाधित भागांतून राज्यात आलेल्या एकूण ५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment