गेल्या काही महिन्यांपासून चीनसह अनेक देशांमध्ये थैमान घातलेल्या करोनाचे रुग्ण पुण्यात आढळले आहेत. पुण्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता पाच झाली असून या सर्वावर पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, यामुळे राज्यभर सतर्कतेत वाढ करण्यात आली असून सर्वच देशांतून भारतात येणाऱ्या नागरिकांची विमानतळांवर कठोर तपासणी केली जाणार आहे.
पुण्यातील एका दाम्पत्याला करोना संसर्ग झाल्याचे सोमवारी सायंकाळी स्पष्ट झाले. हे दांपत्य दुबई येथे सहलीसाठी जाऊन आले होते. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या दोघांपैकी एका रुग्णामध्ये सोमवारी करोनाची सौम्य लक्षणे दिसून आली. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने वैद्यकीय नमुन्यांची तपासणी केल्यानंतर या दाम्पत्याला करोना संसर्ग असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांच्या निकटच्या सहवासातील तीन व्यक्तींचे नमुनेदेखील तपासणीसाठी देण्यात आले होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यांना करोना संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. डॉ. म्हैसेकर म्हणाले, हे दाम्पत्य फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात ४० जणांबरोबर दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. १ मार्चला ते भारतात परतले. त्यांपैकी एकाला त्रास झाल्यामुळे ८ मार्चला त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. करोना चाचणी सकारात्मक आल्याने त्यांना नायडू रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
दुबई हे ठिकाण केंद्र शासनाने जाहीर केलेल्या बाधित ठिकाणांच्या यादीत नसल्यामुळे या प्रवाशांचे विलगीकरण करण्यात आले नव्हते. भारतात परतल्यानंतर या दाम्पत्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेण्यात आली. त्यांची मुलगी, एक सहप्रवासी तसेच मुंबईहून पुण्याला टॅक्सीतून सोडणारा चालक या तिघांना देखील संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार तसेच त्यांचे सहकारी यांची तपासणी करण्यात येणार आहे. सदर दाम्पत्यासोबत दुबई येथे गेलेल्या सर्व ४० व्यक्तींची नावे आणि संपर्क प्रशासनाकडे उपलब्ध असून हे विविध जिल्ह्य़ांतील नागरिक असल्याने संबंधित जिल्हा प्रशासनाला संपर्क करून त्यांची तपासणी करण्याबाबत सूचना करण्यात आल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले.
सर्व प्रवाशांची तपासणी
- मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवापर्यंत १,१०१ विमानांमधील १,२९,४४८ प्रवासी तपासण्यात आले आहेत.
- केंद्राच्या सूचनेनुसार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी विमानतळांवर करण्यात येत आहे. इराण, इटली आणि द. कोरियातून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे.
- राज्यात बाधित भागातून एकूण ५९१ प्रवासी आले आहेत. राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षांमध्ये ३०४ जणांना दाखल करण्यात आले. २८९ जणांना संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले.
सहा संशयित कस्तुरबामध्ये
करोनाचा संसर्ग झालेल्या पुण्यातील दाम्पत्यासोबत प्रवास केलेल्या मुंबईतील सहा प्रवाशांना कस्तुरबा येथील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले असून यांचे अहवाल बुधवारी येणार आहेत. दरम्यान, बाधित देशांतून शहरात आलेल्या ५३७ प्रवाशांशी पालिकेने संपर्क साधला आहे.
आयटी कर्मचाऱ्यांना घरून कामाची मुभा
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी परदेशातील कंपन्यांनी घरून काम करण्याचे आवाहन केले आहे. पुण्यात हिंजवडीसह खराडी आणि अन्य भागात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या मोठय़ा संख्येत आहेत. परदेशातील कंपन्यांच्या धर्तीवर पुण्यातील काही कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. तसेच परदेशात न जाण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment