इंडिगो (इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड) विमानत झुरळ निघाले

पुणे ते दिल्ली दरम्यान विमान प्रवास करताना प्रवासात आसनाखाली झुरळ निघल्यामुळे झालेल्या त्रासापोटी दोन प्रवाशांकडून ग्राहक मंचात दाखल करण्यात आलेल्या दाव्यात ग्राहक तक्रार निवारण मंचाने प्रवाशांना ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश इंडिगो (इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड) कंपनीला दिला आहे. विमान प्रवाशांना तिकिटाची रक्कम नऊ टक्के व्याजदराने परत करण्यात यावी, असे या निकालात नमूद करण्यात आले आहे.

ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्या क्षितीजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांनी नुकताच हा निकाल दिला. विमान प्रवासी स्कंद असीम बाजपेयी (रा. कल्पिका अपार्टमेंट, शीला विहार कॉलनी, कोथरूड) आणि सुरभी राजीव भारद्वाज (रा. वनराई हाइटस्, एमआयटी कॉलेज रस्ता, कोथरूड) यांनी इंडिगो आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या विरुद्ध मंचाकडे तक्रार केली होती. गेल्या वर्षी ३० मार्च रोजी ही तक्रार दाखल केली होती. 

बाजपेयी आणि भारद्वाज ३१ डिसेंबर २०१८ रोजी पुणे विमानतळावरुन इंडिगो विमान कंपनीच्या विमानातून दिल्लीला गेले होते. विमान प्रवासात आसनाखाली झुरळ निघाल्याने त्यांनी तातडीने तो भाग निर्जंतुकीकरण करण्याची विनंती केली. विमानातील कर्मचाऱ्यांना निर्जंतुकीकरण करणे शक्य न झाल्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार मोबाइल संदेश; तसेच ई-मेलद्वारे नोंदविण्यास सांगितली होती. दिल्ली विमानतळावर विमान उतरल्यानंतर त्यांनी संबंधित कंपनीकडे तक्रार दिली. त्या वेळी विमान प्रवासात झुरळ निघणे, ही गंभीर बाब नसून तक्रारदाराची तक्रार गंभीर नसल्याचे कंपनीकडून कळविण्यात आले. त्यानंतर बाजपेयी आणि भारद्वाज यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.
बाजपेयी यांनी तक्रारीत नमूद केले होते की, 'माझ्या हाताला जखम झाली होती. झुरळापासून बचाव करताना मला वेदना झाल्या. मला संसर्गजन्य आजार असल्याने मला झुरळाचा त्रास झाला.' याबाबत तक्रार करूनही योग्य दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नुकसानभरपाई आणि तक्रार खर्चाची रक्कम देण्याची मागणी बाजपेयी आणि भारद्वाज यांनी केली होती. बाजपेयी आणि भारद्वाज यांच्या बाजूने ग्राहक मंचाने निकाल दिला.

'पुनरावृत्ती होऊ नये'
तक्रारदार बाजपेयी आणि भारद्वाज यांना विमान प्रवासाची रक्कम ८ हजार ५७४ रुपये नऊ टक्के व्याजदराने देण्यात यावेत; तसेच मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी, तक्रार खर्चापोटी ५० हजारांची रक्कम निकालाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत द्यावेत. इंडिगो कंपनीने ग्राहकांना सेवा-सुविधा पुरविण्यात कसूर केल्याचे मत ग्राहक मंचाने निकालात नोंदविले. अशा प्रकाराची यापुढील काळात पुनरावृत्ती होता कामा नये, असे आदेश विमान कंपनीला देण्यात आले आहेत.
 





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king