बॉलिवूडला आणखी एक धक्का : नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांचे निधन

बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे, तो म्हणजे ‘मास्टरजी’ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांच्या निधनाच्या बातमीने! त्यांचे हृदयविकाऱ्याचा धक्क्याने निधन झाले. बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी ट्विटरवरून सरोज खान यांच्या निधनाने दु:ख व्यक्त केले आणि श्रद्धांजली वाहिली आहे. २० जून दरम्यान श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची करोनाची चाचणीदेखील करण्यात आली होती. मात्र, त्यात करोना नसल्याचे निष्पन्न झाले होते. 
हिंदी सिनेसृष्टीत सरोज खान यांनी सुमारे पाच दशकं नृत्यदिग्दर्शक म्हणून आपली कारकिर्द गाजवलेली आहे. श्रीदेवीपासून माधुरी दीक्षितपर्यंत अशा अनेक अभिनेत्रींना ‘डान्स क्वीन’चा मान मिळवून देण्यात सरोज खान यांचा मोलाचा वाटा आहे. श्रीदेवीचं ‘हवा हवाई…’ आणि माधुरी दीक्षितचं ‘धक धक करने लगा…’ या गाण्यातील नृत्यांचं दिग्दर्शन सरोज खान यांनी केलं होतं. ही गाणी आणि त्या गाण्यातील नृत्य आजही लोकप्रिय आहेत.
वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम केलं आणि त्यानंतर बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. १९७४ मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ‘गिता मेरा नाम’ या चित्रपटासाठी काम केले होते. सरोज खान यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक बी. सोहनलाल यांच्याकडून नृत्यदिग्दर्शनाचे धडे गिरवले होते. त्यांनी बी. सोहनलाल यांच्याशी विवाह केला होता. असं बोललं जातं की, सरोज खान आणि बी. सोहनलाल यांच्यामध्ये ३० वर्षांचे अंतर होते. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी विवाह केलेला होता. लग्नानंतर त्यांनी इस्लाम धर्मदेखील स्वीकारला होता. त्यांचे मूळ नाव निर्मला नागपाल होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब पाकिस्तानमधून भारतात आले होते.
सरोज खान यांनी त्यांच्या कार्यकाळात सुमारे २००० हून अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. त्यामुळेच त्यांना ‘मदर ऑफ डान्स’ म्हणून ओळखले जाते. २०१९ मध्ये आलेल्या माधुरी दिक्षितच्या ‘कलंक’ चित्रपटातील ‘तबाह हो गये…’ या गाण्याचं केलेलं नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांचं अखेरचं गाणं ठरलं. सरोज खान यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांच्या यादीत मिस्टर इंडिया (१९८७) चित्रपटातील ‘हवा हवाई…’, तेजाब चित्रपटातील (१९८८) ‘एक दो तीन…’, बेटा चित्रपटातील (१९९२) ‘धक धक करेने लगा…’ आणि देवदास चित्रपटातील (२००२) चित्रपटातील ‘डोला रे डोला’ आदींचा समावेश होतो.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment