३० डिसेम्बरला होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा समावेश होणार आहे. त्यांनी गृह खाते घेतले नाही तर ते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जाऊ शकते. मात्र सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे त्यांच्या संयत कार्यपद्धतीमुळे सध्या शरद पवार यांच्या सर्वाधिक जवळ गेले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे गृह खात्यासाठी त्यांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे.
अजित पवार यांना गृह खाते मिळावे, अशी त्यांच्या समर्थक आमदारांची इच्छा आहे. मात्र गृह खाते हे जितके ताकद देणारे असते तितकेच ते विवादांना सामोरे जाण्याचे कारणही ठरू शकते. त्यामुळे अजितदादांच्या समर्थकांमध्येच यावरून दोन गट आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी गृह खाते नाकारल्यास त्यासाठी दिलीप वळसे व जयंत पाटील यांच्यात स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेमध्ये देखील मंत्रिपदासाठी इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केल्याचे कळते. मंत्रिपदासाठी शिवसेनेकडून अनेक नावांची चर्चा सुरू आहे. यात रविंद्र वायकर, संजय राठोड, गुलाबराव पाटील, दादा भुसे, अनिल परब, तानाजी सावंत, प्रकाश आबिटकर, सुनील प्रभू, दीपक केसरकर, उदय सामंत, आशीष जैस्वाल, रविंद्र फाटक, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, राहुल पाटील, शंकरराव गडाख, मंजुळा गावित, प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर आदींचा या नावांमध्ये समावेश असल्याचे कळते. विधान परिषदेवरील दिवाकर रावते, रामदास कदम यांच्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment