पार्किंगमधील वाहनांची जबाबदारी हॉटेलचीच:SC


तुम्ही  मॉल किंवा हॉटेलमध्ये पैसे देऊन पार्किंग करता. पण ‘Parking at owners risk’ अशी पाटी प्रत्येक ठिकाणी लागलेली दिसते. सुप्रीम कोर्टाने यावर मोठा निर्णय दिला आहे. ‘मालकाच्या जबाबदारीवर पार्किंग’ अशी पाटी लावून हॉटेल अंग काढून घेऊ शकत नाहीत. वाहनाच्या नुकसानीसाठी संबंधित हॉटेल व्यवस्थापनच जबाबदार असेल, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. 

जस्टिस एम. एम. शांतनागौदार आणि जस्टिस अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला. राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवला. १९९८ ला नवी दिल्लीतील ताज महल हॉटेलमधून एका ग्राहकाची मारुती झेन ही कार चोरी गेली होती. हॉटेल व्यवस्थापनावर हलगर्जीपणाचा आरोप करत २.८ लाख रुपयांची नुकसान भरपाई या ग्राहकाने मागतली. पण यासाठी हॉटेलने नकार दिल्यानंतर प्रकरण राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर गेलं.




मोठ्या हॉटेलमध्ये वाहन मालक वाहनाची चावी पार्किंगसाठी हॉटेल कर्मचाऱ्याकडे देतात. पण ही पार्किंग वाहन मालकाच्या जबाबदारीवर असल्याचे बोर्ड ठिकठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे वाहन मालकाने पार्किंगची चिठ्ठी दाखवल्यानंतर वाहन आणून देणं ही हॉटेलची जबाबदारी आहे, असा निर्णय कोर्टाने दिला. पार्किंग मोफत होती म्हणून नुकसान भरपाई दिली जाऊ शकत नाही, असा दावा करणेही अयोग्य आहे. कारण, ग्राहकाकडून रुम, अन्न, प्रवेश शुल्क, लाँज शुल्क, क्लब अशा विविध गोष्टींसाठी भरमसाठ पैसे आकारले जातच असतात, असंही कोर्टाने स्पष्ट केलं. 
‘आम्ही ‘own risk’ अशी पाटी लावली होती’, असा दावा ताज हॉटेलने केला होता. त्यावरही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. ‘वाहन पार्किंग केल्यानंतर हलगर्जीपणाने वागलेले हॉटेलचे कर्मचारी कुठे होते. ‘own risk’ हा टॅग त्यांच्या मदतीसाठी येणार नाही,’ असे खडेबोलही कोर्टाने सुनावले. 

‘दरम्यान, प्रत्येक परिस्थितीमध्ये हॉटेलच जबाबदार असेल, असंही नाही. वाहनाचं नुकसान किंवा चोरी तिसऱ्याच व्यक्तीमुळे झालेली असू शकते. किंवा मालकाच्या स्वतःच्या चुकीमुळे, नैसर्गिक कारणामुळे वाहनाचं नुकसान होऊ शकतं, जे आपल्या हाताबाहेरचं आहे,’ असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं. 




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment