PMC बँकेतून १ लाख काढता येणार, पण....

मुंबई: पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदार आणि ठेवीदारांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत (मेडिकल इमर्जन्सी) खातेदारांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांशी संपर्क साधता येईल. 
रिझर्व्ह बँकेनं पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्यानंतर लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. हवालदिल झालेले खातेदार मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. या खातेदारांना आता मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत खातेदारांना एक लाख रुपये काढता येतील. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या प्रशासकांशी संपर्क साधावा लागणार आहे. आरबीआयनं ही माहिती उच्च न्यायालयात दिली आहे. 

बँक खात्यातून पैसे काढण्यावरील बंदीच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीवेळी आरबीआयनं न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात खातेदारांना विवाह, शिक्षण यांच्यासह अन्य आपत्कालीन स्थितीत ५० हजारांपर्यंतची रक्कम काढता येते, असं नमूद केलं आहे. 


प्रशासकांशी संपर्क साधावा लागेल
'अडचणीत सापडलेले खातेदार-ठेवीदार आरबीआयनं नेमलेल्या प्रशासकांशी संपर्क साधू शकतात. त्यांना बँक खात्यातून १ लाख रुपये काढण्याची परवानगी मिळवता येईल,' असं आरबीआयच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. रक्कम काढण्यावर जी बंदी घातली आहे, ती बँक आणि ठेवीदारांच्या हितांच्या रक्षणासाठी गरजेची आहे, असंही आरबीआयनं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. 

सहा महिन्यांसाठी निर्बंध 

पीएमसी बँकेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे. २४ सप्टेंबरला आरबीआयनं सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. 

पुढील सुनावणी ४ डिसेंबरला
बँकेत पैसे जमा करणाऱ्या ग्राहकांच्या अडचणी कमी करण्यासाठी आरबीआयनं वैद्यकीय उपचार, विवाह, शिक्षण, उपजीविका आदींसह अन्य अडचणी लक्षात घेऊन मर्यादेपेक्षा अधिक रक्कम काढता येईल, अशी व्यवस्था केली आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत एक लाख रुपयांपर्यंत आणि अन्य कारणांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत पैसे काढता येतील, अशी माहिती आरबीआयच्या वतीनं वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. या प्रकरणी न्यायालयात ४ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment