विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या भांडणात सत्ता स्थापन न करणाऱ्या राजकीय पक्षांच्या निषेधार्थ नगरमध्ये 'पीपल्स हेल्पलाइन', 'भारतीय जनसंसद' व 'मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन' या संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी राजकीय पक्षांचे प्रतिकात्मक दगडे पाण्यात ठेऊन आंदोलनकर्त्यांनी आक्रोश केला. राजकीय पक्षांनी राज्यात त्वरीत स्थिर सरकार द्यावे, अशी मागणीही या वेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
राज्यात शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे. देशात मंदीचे सावट आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अनेक कामे रेंगाळली आहेत. तर, दुसरीकडे राज्यातील आघाडी व युतीचे सर्व पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी जनतेला वेठीस धरण्याचे काम करीत आहेत. त्यामुळेच खुर्चीसाठी भांडणाऱ्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस यांचे प्रतिकात्मक दगड पाण्यामध्ये बुडवत हे आंदोलन केले जात असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. स्थापन होणारे सरकार जनतेच्या भल्यासाठी असते, ही संकल्पना नेते विसरले आहेत. तरी राज्यात लवकर सरकार स्थापन करुन सर्वसामान्यांची प्रश्ने मार्गी लावावीत, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
हुतात्मा स्मारक येथे झालेल्या या आंदोलनात अॅड. कारभारी गवळी यांच्यासह अशोक सब्बन, अंबिका जाधव, लिला रासने, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, विठ्ठल सुरम, किशोर मुळे, लतिका पाडळे, संगिता साळुंखे, नजमा शेख, हिराबाई ग्यानप्पा, शबाना शेख, अंबिका नागुल, आशा जोमदे आदी सहभागी झाले होते.
0 comments:
Post a Comment
Please add comment