डोंगराच्या कानाकोपऱ्यावर दिसणाऱ्या हॉटेलच्या रांगा, जंगलातल्या कुशीतले आलिशान बंगले, गल्ली बोळापर्यंत पोहोचलेले मोठे रस्ते, वाढता प्लास्टिकचा कचरा, प्रदूषण आणि हजारो पर्यटकांमुळे येणारा ताण येऊनही महाबळेश्वरची जैवविविधता आजही समृद्ध आहे. मात्र, या पर्यटनावर वेळीच बंधने आली नाहीत, तर पश्चिम घाटातील सर्वाधिक संवेदनशील आणि दुर्मिळ वन्यजीवन, वनसंपदेने व्यापलेले हे लोकप्रिय हिलस्टेशन आपण डोळ्यादेखत गमावणार आहोत, असा निष्कर्ष महाबळेश्वर-पाचगणी जैवविविधता सर्वेक्षण समितीच्या अहवालातून पुढे आला आहे.
महाबळेश्वरमधील प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती असे वेगवेगळे विषय घेऊन पर्यावरण अभ्यासकांनी गेल्या दोन ते तीन दशकांत संशोधन केले. मात्र, महाबळेश्वर आणि पाचगणीतील संवेदनशील जैववैविध्याचा सर्वंकष आढावा घेणारे सर्वेक्षण आजपर्यंत झाले नव्हते. या धर्तीवर केंद्र सरकारने नेमलेली महाबळेश्वर पाचगणी पर्यावरणीयदृष्ट्या संवनेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) उच्चस्तरीय कमिटी, जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी 'रानवा' या संस्थेला सर्वेक्षणाची जबाबदारी दिली आहे. प्रकल्प समितीने पहिल्या टप्प्यातील निरीक्षण अहवाल 'मटा'कडे शेअर केला. अठरा महिन्यांच्या या प्रकल्पाला एप्रिलमध्ये सुरुवात झाली. यात प्रामुख्याने पृष्ठवंशी प्राणीगट, अपृष्ठवंशी गटातील फुलपाखरे-पतंग, चतुर, कोळी, वनस्पती, काळाच्या ओघात त्यांच्या संख्येत झालेला फरक, त्यामागची कारणे, विविध निवास प्रकार, अन्न-साखळ्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. डॉ. संजीव नलावडे, डॉ. अपर्णा वाटवे, डॉ.वरद गिरी, डॉ. नीलेश डहाणूकर, डॉ. पंकज कोपर्डे, डॉ. राहुल व डॉ. स्वप्ना पुरंदरे या तज्ज्ञांचा यात समावेश आहे.
डॉ. संजीव नलावडे याबद्दल म्हणाले, 'सर्वेक्षणातील सकारात्मक बाब म्हणजे जुन्या नोंदींच्या तुलनेत पक्षी आणि प्राण्यांच्या प्रजातीत बदल झालेले नाहीत. महाबळेश्वरमध्ये पूर्वीच्या नोंदीनुसार बिबट्या, माकड, वानर, गवा, रानडुक्कर असे ३० पेक्षा अधिक प्रकारचे सस्तन प्राणी असल्याची माहिती होती. या सर्वेक्षणातही आम्हाला बहुतांश प्राणी दिसले, मात्र त्यांची संख्या घटली आहे. मुख्यत: उदमांजर, खवले मांजर, पिसोरी, सांबर, साळिंदर यांची संख्या घटल्याची प्राथमिक माहिती आहे. लिंगमळा परिसरात १९९०च्या सुमारास शेकरू सहज दिसत असे, तसे या वेळी आम्हाला दिसले नाही. माकडाची संख्या वाढली असल्याने ते शेकरूंची घरटी उद्ध्वस्त करीत असल्याचे निरीक्षण प्रकल्पातील विद्यार्थी संदेश भिसे यांनी नोंदवले आहे. पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांनी १९८४-८८ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात महाबळेश्वर-पांचगणी परिसरात पक्ष्यांच्या २२० प्रजातींची नोंद झाली होती. गेल्या तीस वर्षांत पक्षी विविधतेत फारसा फरक झाला नाही, पण काही पक्ष्यांची संख्या अधिवास संपुष्टात आल्याने घटली आहे. राखी रानकोंबड्याची शिकार पूर्वी मोठ्या प्रमाणात होत होती, आता ती कमी झाल्याने कोंबड्यांची संख्या वाढल्याची दिसली.'
विविध अभ्यासकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार
सजीव गट अंदाजे प्रजातींची संख्या सर्वेक्षणात दिसलेल्या प्राण्यांची संख्या (३१ ऑक्टोबरपर्यंत)
सत्तन प्राणी ३६ - २२
पक्षी - २२०- ९३
सरपटणारे प्राणी - ६० - २०
उभयचर प्राणी - २४ - १०
गोड्या पाण्यातील मासे ५३ -१४
का वाचवायचे महाबळेश्वरला?
महाबळेश्वर हा महाराष्ट्रातील पश्चिम घाटाचा मध्य भाग आहे. भौगोलिक आणि पर्यावरण दृष्ट्या हा परिसर असाधारण आहे. या परिसराचे वैशिष्ट्य म्हणजे या भागात घनदाट जंगल, माळरान, पठार, जलाशय असे विविध अधिवास आढळून येतात. कृष्णा, कोयना, सावित्री, वेण्णा आणि सोळशी अशा पाच नद्या या पठारावर उगम पावतात. अशी स्थिती सह्याद्रीत अन्यत्र आढळत नाही. हे वैशिष्ट्य ओळखून इंग्रजांनी दोनशे वर्षांपूर्वी महाबळेश्वरवर हिल स्टेशन वसवले. केंद्र सरकारने २००१मध्ये महाबळेश्वर-पाचगणीला पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (इको-सेन्सिटीव झोन) म्हणून जाहीर केले. महाबळेश्वर तालुक्यातील ५२ आणि जावळी तालुक्यातील ६ गावांचा या या संवेनदशील क्षेत्रात समावेश करण्यात आला. मात्र, आजपर्यंत महाबळेश्वरमधील जैवविविधतेचा समग्र संशोधन अहवाल झाला नव्हता.
0 comments:
Post a Comment
Please add comment