राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे नव्या वादात अडकले आहेत. धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप रेणू शर्मा या महिलेनं केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेनं ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली असून, या प्रकरणावरून भाजपा आक्रमक होताना दिसत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सविस्तर खुलासा करत सहमतीनं संबंध असल्याचं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
“महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध ११ जानेवारी रोजी रेणू अशोक शर्मा या महिलेनं ब्लॅकमेल करून अनैसर्गिक कृत्य व बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करून कबूल केलं आहे की, ‘करुणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्रपरिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधातून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलं आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांवर या मुलांना पालक म्हणून माझंच नाव आहे. ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनीदेखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलं असून, स्वीकृती दिलेली आहे. सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे.’ सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी व कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, याची आपण नोंद घ्यावी,” अशी मागणी उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
“धनजंय मुंडे यांनी स्वत: त्यांना दोन पत्नी आहेत, असे मान्य केलं आहे. त्यात आता तिसरी महिला त्यांच्यावर आरोप करतेय, त्यामुळे जोपर्यंत धनंजय मुंडे या प्रकरणातून मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment