स्वत:चं डोकं लावून औषधं घेऊ नका –अजित पवार |
महाराष्ट्रातही करोनाचे संशयित रुग्ण सापडले असल्याने सध्या चिंतेचं वातावरण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकांना आवाहन करताना घाबरु नका, मात्र काळजी घ्या असं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करण्याची विनंती करताना स्वत:चं डोकं लावून औषधं घेऊ नका असंही आवाहन केलं. काही शंका आल्यास डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणं तसंच उपचार घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. यानिमित्ताने मीदेखील हे आवाहन करतो असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांनी यावेळी मुंबईतील संशयित असणाऱ्यांना करोनाची लागण झाली असेल तर चिंतेची बाब आहे. कारण याचा अर्थ झपाट्याने त्याचा फैलाव होत आहे असं अजित पवारांनी म्हटलं आहे. “लोकांना माझं आवाहन आहे की घाबरुन जाऊ नका. प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आवाहन केलं आहे तशी काळजी घ्या. लोकांशी थेट संपर्क होणार नाही याची खबरदारी घ्या. खोकला आल्यानंतर रुमाल वापरणे अशा गोष्टींची काळजी घेण्याची नितांत गरज आहे,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असून यावेळी बैठकीत वेगळे विषय आहेत. करोनावरही बैठकीत चर्चा केली जाणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली. मुंबईत संशयित आठ लोकांचा रिपोर्ट काही वेगळा आला तर त्यानुसार वेगळे निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही असं अजित पवारांनी सांगितलं.
सध्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरत असून त्यावर विश्वास ठेवू नका अशी विनंती अजित पवारांनी यावेळी केली. पुण्यात संशयित रुग्ण आले तर तात्काळ उपचार करण्यासंबंधी रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली.
0 comments:
Post a Comment
Please add comment