परभणी शहरातील बसस्टँड रोडवर असलेल्या हरियाणा जिलेबी सेंटरचे मालक धर्मवीर दामोदर व त्यांचा मुलगा सनीसिंग उर्फ मनमोहन दामोदर हे गेल्या ४२ वर्षांपासून परभणीकरांना गरमागरम जिलेबीची सेवा देतात. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातून सुद्धा नागरिक ही खास जिलेबी खाण्यासाठी येतात. मागील नऊ वर्षांपासून सनीसिंग हे एक अनोखा उपक्रम राबवत आहेत. १ जानेवारीला खासगी व जिल्हा सामान्य रुग्णालयात जन्मास आलेल्या कन्यारत्नास दोन किलो जिलेबी मोफत देतात. या वर्षी देखील सनी सिंग यांनी हा उपक्रम चालूच ठेवला असून त्यात त्यांनी एक नवीन उपक्रम जोडला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात १ जानेवारी मध्यरात्री १२ वाजेनंतर जन्मास आलेल्या ११ कन्यारत्नांच्या पालकांना दोन किलो जिलेबी तर वाटप केलीच, पण सर्वांच्या नावाने जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ परिचारिकेच्या हस्ते एक लकी ड्रॉ काढला. या लकी ड्रॉमध्ये विजेत्या ठरलेल्या हाफीजा शेख शाहरुख यांना एक ग्रॅम सोन्याचे नाणे या ठिकाणच्या डॉ. मोना खान यांच्या हस्ते भेट दिले. त्या मुळे हरियाणा जिलेबी सेंटरच्या या खास उपक्रमाचे रुग्णालयात व शहरात देखील कौतुक होत आहे.
दरम्यान, सनी सिंग यांनी जिल्हा रुग्णालयातील अकरा मुलींच्या पालकांना तर जिलेबी दिलीच. त्याशिवाय त्यांच्या दुकानावर खासगी रुग्णालयात जन्मलेल्या जवळपास बारा कन्या रत्नांच्या पालकांना दुपारपर्यंत जिलेबीचे वाटप केले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांचा हा उपक्रम सुरू होता. विशेष म्हणजे ते जिल्हा रुग्णालयात रात्री बारापर्यंत जन्म घेणाऱ्या कन्यारत्नांच्या पालकांना देखील दोन किलो मोफत जिलेबी देणार आहेत.
याबाबत बोलताना हनी सिंग यांनी या माध्यमातून कन्या जन्माचे स्वागत तर करत आहोत; परंतु सोबतचे पुण्याचे काम आपल्या हातून होत असल्याने समाधान मिळते, असे सांगितले. तर त्यांचे वडील धर्मवीर दामोदर यांनी मुलाला काही तरी चांगले काम करण्यास सांगितल्यामुळे तो त्याच्या परीने हा उपक्रम राबवत आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment